दापोलीला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याची मागणी
दापोली | प्रतिनिधी:
कोकणातील निसर्गसंपन्न आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या दापोली तालुक्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी दापोली तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघाने पुढाकार घेत आमदार प्रमोद जठार यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब नकाते यांच्यासह तालुक्यातील हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे आणि पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरुड येथील हॉटेल अमरनाथ येथे आयोजित विशेष बैठकीत पर्यटन क्षेत्रातील विविध समस्या, संधी आणि भविष्यातील विकास आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर आमदार प्रमोद जठार यांना निवेदन देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.
दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, लाडघर, तामसतीर्थ, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, केळशी, दाभोळ, कोळथरे, असूद, सालदुरे, पन्हाळेकाजी लेणी तसेच उन्हावरे येथील गरम पाण्याचे कुंड ही पर्यटनस्थळे राज्यासह देशभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. या पर्यटन व्यवसायामुळे हजारो स्थानिक कुटुंबांचा रोजगार चालत असून तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळत आहे.
मात्र, रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, पार्किंग आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पर्यटन विकासाला मर्यादा येत असल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे. जवळपास १४ प्रमुख मागण्यांचे निवेदन पर्यटन व्यवसायिक महासंघाने आम. प्रमोद जठार यांना सादर केले., ज्यामध्ये पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण, दुर्गम पर्यटन भागात नवीन मोबाईल नेटवर्क टॉवर उभारणे, पर्यटन क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र (सबस्टेशन), प्रमुख पर्यटनस्थळांवर वाहनतळ सुविधा, सार्वजनिक शौचालये, चेंजिंग रूम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पर्यटन हंगामासाठी विशेष वाहतूक व्यवस्थापन आराखडा, समुद्रकिनाऱ्यांवर लाइफ गार्ड, सीसीटीव्ही, सोलार लाईट आणि सुरक्षा सुविधा, दापोली पर्यटनासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रचार मोहीम, पर्यटन व्यवसायिकांसाठी परवानग्या व शासकीय योजनांसाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा, हर्णे बंदर, सुवर्णदुर्ग, कड्यावरचा गणपती आणि पन्हाळेकाजी लेणी विकासासाठी विशेष निधी, स्थानिक युवकांना टूर गाईड, हॉस्पिटॅलिटी आणि वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण, स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा आणि समन्वय समितीची स्थापना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्र आणि आधुनिक मत्स्यालय, दापोलीतील भारतरत्न सन्मान प्राप्त महापुरुषांचे एकत्रित स्मारक उभारणे. अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब नकाते यांनी सांगितले की, दापोलीच्या पर्यटन विकासासाठी चांगले रस्ते, अखंडित वीजपुरवठा, सक्षम मोबाईल नेटवर्क आणि दर्जेदार मूलभूत सुविधा या काळाची गरज आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास दापोली तालुका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकू शकतो.
पर्यटन क्षेत्राचा विकास झाला तर स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, स्थलांतर कमी होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दापोलीच्या उज्ज्वल पर्यटन भविष्यासाठी हे निवेदन महत्त्वाचे पाऊल मानले जात असून पर्यटन व्यावसायिकांमध्ये याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.












