खेड. (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून खेड एसटी आगाराला नव्याने प्राप्त झालेल्या ३×२ आसन क्षमतेच्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तथा बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ आण्णा कदम यांच्या हस्ते या बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.
खेड तालुक्यातील प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसगाड्या खेड आगारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांमध्ये ३×२ आसन व्यवस्था असल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
यावेळी शिवसेना उपनेते तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, गुहागर तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, संतोष खोपकर यांच्यासह खेड आगार व्यवस्थापक, आगार कार्यशाळा वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, एसटी कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लोकार्पण सोहळ्यामुळे खेड आगाराच्या प्रवासी सेवेमध्ये आणखी भर पडली असून तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. नव्या बसगाड्यांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुखकर व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.











