खेड (प्रतिनिधी) : बोरज-खेड येथील ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या बी. फार्मसी (Bachelor of Pharmacy) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. नुकताच मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत महाविद्यालयाचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.
प्रथम सत्राच्या निकालात कुमारी केतकी चिखले हिने 9.10 एसजीपीए गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी पर्णिका सावंत हिने 8.74 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कुमारी प्रांजळ मानवल हिने 8.45 गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कुमारी खतिजा कवचाली आणि कुमारी मनीषाकुमारी गुप्ता यांनी प्रत्येकी 8.30 गुण मिळवत संयुक्त चौथा क्रमांक मिळविला. कुमारी सिद्रा मुसा हिने 8.21 गुणांसह पाचवा क्रमांक पटकावून यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पावधीतच ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाने कोकण विभागात दर्जेदार शिक्षण आणि सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण निकालांची परंपरा निर्माण केली असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमण तलाठी, सचिव माधव पेठे, संस्थापक सचिव प्रकाश गुजराथी, जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अनिल शिवदे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रुपल पाटणे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन केले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना महाविद्यालय भविष्यातही उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी आणि औषधनिर्माण क्षेत्रात सक्षम व कुशल व्यावसायिक घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. महाविद्यालयातील शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हा उत्कृष्ट निकाल शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.











