राजापूर नगरपरिषदेतर्फे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

राजापूर (प्रतिनिधी): नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी राजापूर नगरपरिषदेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात व्हावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
राजापूर येथील विश्वनाथ विद्यालय क्र. १ तसेच बाजारपेठ येथील उर्दू मुला-मुलींच्या शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या हस्ते जवाहर चौक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
तसेच राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार आणि कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी उर्दू मुला-मुलींच्या शाळेस सदिच्छा भेट देत नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमास नगरसेविका उर्मिला बाकाळकर, नगरसेवक सुलतान ठाकूर, पाणी व स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार, अजिंक्य कांबळे, दिवाकर खडपे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या स्वागत उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या पहिल्या दिवसाची आनंददायी आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.