सरपंच, प्रशासनाविरोधातील फेसबुक पोस्टच्या वादातून हाणामारी.!

समीर सामंत यांच्यावर गुन्हा दाखल.!

मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप.! 

कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद.!

कणकवली : फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच, महसूल प्रशासन तसेच शासकीय यंत्रणेविरोधात फेसबुकवर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या वादातून सामाजिक कार्यकर्ते समीर सदानंद सामंत (रा. बिजलीनगर, फोंडाघाट) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच दोन तोळ्यांची सोन्याची चैन अप्रामाणिकपणे घेऊन गेल्याप्रकरणी त्यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत तक्रारदार संजय वसंत आंग्रे (रा. हवेलीनगर, फोंडाघाट) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी संजना आंग्रे या फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. समीर सामंत यांनी १३ जून रोजी त्यांच्या फेसबुक वरून तहसीलदार, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल अधिकारी, राजकीय पदाधिकारी तसेच शासकीय यंत्रणेबाबत आक्षेपार्ह व खोडसाळ पोस्ट केली होती.

 

त्यानुसार १५ जून रोजी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास संजय आंग्रे हे आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत फोंडाघाट बाजारपेठेतील सापळे येथील नवीन पुलाच्या बांधकामाची पाहणी करत होते. त्यावेळी समीर सामंत हे त्यांचे भाऊ अरुण वसंत सामंत यांच्यासह तेथे आले. यावेळी समीर सामंत यांनी तुम्ही येथे काय करता, या पुलाच्या बांधकामाचेही पैसे खायचे आहेत काय? असे बोलल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत तुम्हाला एकेकाला बघून घेतो, ठार मारून टाकतो, अशी धमकी दिली.

 

तसेच, फेसबुकवरील पोस्टबाबत जाब विचारल्यानंतर समीर सामंत यांनी धावत येऊन संजय आंग्रे यांच्या शर्टाच्या गळ्याला धरून ओढले, धक्काबुक्की केली व ठोसे मारून मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

 

या झटापटीदरम्यान संजय आंग्रे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची व अंदाजे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन तुटली असून ती समीर सामंत यांनी अप्रामाणिकपणे घेऊन असल्याचेही संजय आंग्रे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आह.

 

या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(३), ३१४ आणि ११५(२) अन्वये समीर सामंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.