‘ग्रो बीग टेक्नॉलॉजी’ कंपनीला अखेर मुदतवाढ नाकारली

सावंतवाडी नगरपालिका सभेत ठराव मंजूर  

सांडपाणी प्रकल्पावरून प्रशासनाचे कान उपटले

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक सर्वसाधारण सभा आज कमालीची वादळी ठरली. शहराच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या सांडपाणी प्रकल्पावरून उपनगराध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरले, तर वादग्रस्त ठरलेल्या ‘ग्रो बीग टेक्नॉलॉजी’ कंपनीला मुदतवाढ देण्याचा ठराव नामंजूर केल्याची घोषणा नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले यांनी केली.

नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

या सभेत ‘ग्रो बीग’च्या मुदतवाढीच्या ठरावाला विरोध दर्शवण्यात आला. यावर नगरसेवक देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांनी रोजगाराचा मुद्दा म्हणून ‘ग्रो बीग’ला मुदतवाढ देण्याची व जागा स्थानिकांना देण्याची मागणी केली. मात्र, सभापती आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांनी, “या कंपनीच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषदेची बदनामी केली आहे,” म्हणून विरोध केला. नगरसेवक तौकिर शेख यांनीही, “या कंपनीने खासगी मालमत्तेचे नुकसान केले आणि जाब विचारणाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करून नंतर समझोता केला, त्यामुळे मुदतवाढ नको,” अशी भूमिका घेतली. शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनी हात उंचावून मतदानाची मागणी केली, पण नगराध्यक्षांनी थेट मुदतवाढ नामंजूर केल्याचे जाहीर केले.

 

*अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपिडीसाठी जागा देणार*

दरम्यान, सावंतवाडी शहरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपिडी सुरू करण्यासाठी न.प. मार्फत जागा देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय आज सभागृहात सर्वानुमते घेण्यात आला. याबाबत नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी नगराध्यक्षांसह संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करत हा निर्णय शहरवासियांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे सांगितले. तर आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचेही अभिनंदन केले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, प्र‌. मुख्याधिकारी विनायक औंधकर आदींसह सभापती, नगरसेवक उपस्थित होते.

 

*सांडपाणी प्रकल्पावरून उपनगराध्यक्ष आक्रमक*

तीन मासिक सभांमध्ये ठराव होऊनही सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पावर प्रशासनाने काहीच पाठपुरावा केला नसल्याने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हा प्रकल्प प्रशासन हलक्यात घेतंय का? याचे गांभीर्य तुम्हाला नाही का?” असा सवाल त्यांनी केला. मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने सभापती आनंद नेवगी आणि सुधीर आडिवरेकर उत्तर देण्यास उठले असता, “उत्तर सीओ यांनीच द्यावे, सभापतींनी नाही,” अशी मागणी संजू परब यांनी केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी “शासकीय एजन्सीशी फोनवर चर्चा झाली आहे” असे सांगताच, ॲड. निरवडेकर यांनी “अधिकृत पत्रव्यवहार असेल तर सभागृहात सादर करा, फोनवरील गप्पा नकोत,” अशा शब्दांत खडेबोल सुनावले. नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही या मुद्द्याला पाठिंबा दिला. शेवटी नगराध्यक्षांनी यात मध्यस्थी करत यावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.

 

*कुत्रे पकडणारी टीम वाढवणार*

नगरसेवक अजय गोंदावळे यांनी पोस्ट खात्याने न.प.च्या २६ गुंठे जागेत घातलेले कुंपण काढून ती जागा ताब्यात घेण्याची मागणी केली. तर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांच्या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा सवाल नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी केला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी कुत्रे पकडणारी टीम वाढवणार असल्याचे सांगत, २ कोटींच्या शेल्टर प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठवल्याचे सांगितले.

*१० वर्षांपासून १ कोटींची अनामत रक्कम अडकली!*

शिल्पग्राम प्रकल्प चालवण्यासाठी प्रशासनाने आधारलेली १ कोटी रुपयांची अनामत रक्कम १० वर्षे झाली तरी वसूल का केली नाही? न.प.चे उत्पन्न बुडत नाही का?” असा सवाल नगरसेवक संजू परब यांनी केला. तसेच व्यापारी संकुलातील थकीत भाड्याचा मुद्दाही मांडला. “मी नगराध्यक्ष असताना नोटीस दिली होती, आता संबंधितांना ३ महिन्यांची मुदत देऊन व्याजासह पैसे वसूल करा,” असे त्यांनी सांगितले. यावर सीओनी तात्काळ नोटीस बजावण्याचे मान्य केले. शेवटी संजू परब यांनी नगराध्यक्षांना, “तुम्ही माझ्याच प्रभागातील आहात, त्यामुळे निधीच्या बाबतीत प्रभागाला झुकते माप द्या,” अशी आग्रही मागणी केली.