सातारा – सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांपेक्षा चर्चेत राहिला तो एक वेगळाच क्षण. जिल्हा परिषद अध्यक्ष–उपाध्यक्ष निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच साताऱ्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच चौकटीत दिसून आले.
राजकीय आरोप–प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. एकमेकांना टाळी देत, गळाभेट घेत आणि हलक्याफुलक्या गप्पांमध्ये सहभागी होत नेत्यांनी वातावरणात रंगत आणली.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगितल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. “काय तुझ्या मनात… सांग माझ्या कानात” अशा शैलीत रंगलेली ही मस्करी उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मतभेद एका बाजूला आणि वैयक्तिक मैत्री दुसऱ्या बाजूला, असं चित्र साताऱ्यात पाहायला मिळालं.











