वैभववाडी येथील प्राध्यापक डॉ. नामदेव गवळी यांचे निधन 

वैभववाडी l प्रतिनिधी :    वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, कवी व मृदू स्वभावाचे शिक्षक डॉ. नामदेव गवळी यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून डॉ. गवळी यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. अनेक वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करताना संस्कारक्षम शिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले.

साहित्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या ‘भातालय’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, मराठी साहित्य परिषद, मुंबई यांच्यासह विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले होते.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ असा परिवार आहे.

डॉ. नामदेव गवळी यांच्या निधनाने शिक्षण व साहित्य क्षेत्रातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.