रजवेलमध्ये भीषण आग; गोठा जळून खाक, २५ जनावरांचा होरपळून मृत्यू

खेड : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून संबंधित पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना गुरुवारी पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास घडली. पहाटेची वेळ असल्याने सुरुवातीला आग लागल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात सापडला. गोठ्यात मोठ्या संख्येने जनावरे बांधलेली असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी धावपळ उडाली. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता जनावरे वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुतांश जनावरे त्यात अडकून पडली.
घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग परिसरातील इतर घरांपर्यंत आणि मालमत्तेपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. मात्र तोपर्यंत गोठा आणि त्यामधील २५ जनावरे पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. दोन म्हशींना मात्र सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने त्यांचे प्राण वाचले.
या आगीत मृत्युमुखी पडलेली जनावरे ही संबंधित कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होती. दूध व्यवसायावर अवलंबून असलेल्या या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांच्या कष्टाने उभा केलेला पशुधनाचा साठा काही क्षणांत नष्ट झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत शॉर्टसर्किट, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. महसूल आणि पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करण्यात येत असून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.