तालुक्यातील अंजनवेल, पडवे येथील दोन प्रमुख कामांचा समावेश
पायाभूत सुविधांचा कायापालट, सागरी मंडळांकडून होणार कामांची अंमलबजावणी
आशिष कारेकर गुहागर:
जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमार बांधवांसह पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जेटी निर्माण करणे, जोडरस्ते बांधणे आणि समुद्राच्या उधाणापासून गावांचे रक्षण करण्यासाठी संरक्षक बंधारे उभारणे अशा एकूण ६ मोठ्या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकांना आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गृह (बंदरे) विभागाने मंगळवारी या सर्व विकासकामांसाठी एकूण ८५ कोटी ८४ लक्ष ३० हजार ५८४ रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या विकासकामांचे प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि खनिकर्म मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या आराखड्यांना मंजुरी देण्याचे निश्चित करण्यात आले. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित बस असलेल्या किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
गुहागर तालुक्यातील दोन प्रमुख कामांचा यामध्ये समावेश आहे. अंजनवेल येथील अंजनवेल भोईवाडी जेट्टीपर्यंत जाणाऱ्या जोडरस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी १४ कोटी १० लक्ष ४० हजार ५४४ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या रस्त्यामुळे जेट्टींपर्यंतची वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. तसेच, तालुक्यातील पडवे येथील समुद्रकिनाऱ्यावर लाटांच्या
तीव्रतेमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी आणि लगतच्या वस्तीला संरक्षण देण्यासाठी आधुनिक संरक्षक बंधारा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी १४ कोटी ९ लक्ष ८६ हजार ४६७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पांमुळे गुहागर तालुक्यातील परिसरातील सागरी पर्यटनाला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मोठ्या विकास पॅकेजमुळे गुहागर तालुक्यातील तसेच एकूणच जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील गावांचे अर्थकारण बदलण्यास मदत होणार असून, मच्छीमार, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना याचा थेट फायदा होणार आहे.












