बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
सावंतवाडी । प्रतिनिधी :
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कामळेवीर बाजारपेठ येथे आज दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे महामार्गाच्या कडेला असलेले एक महाकाय वडाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच, झाड कोसळल्याने मुख्य विद्युत वाहिनी तुटली असून कामळेवीर आणि नेमळे परिसरातील विद्युत प्रवाह पूर्णपणे खंडित झाला आहे.
वेंगुर्ला-बेळगाव महामार्गाच्या कडेला सुमारे १०० ते १५० वर्षांची जुनाट आणि धोकादायक झाडे उभी आहेत. यापूर्वीही पावसाळ्यात वाहनचालकांच्या अंगावर आणि वाहनांवर वृक्ष कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे भविष्यात एखादा मोठा जीवघेणा प्रसंग ओढवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील सर्व धोकादायक वृक्ष त्वरित हटवावेत किंवा महाकाय वृक्षांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करावी, अशी तीव्र मागणी वाहनचालक, प्रवासी आणि कामळेवीर बाजारपेठेतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.












