गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; शैक्षणिक यशाचा गौरवशाली सोहळा
स्वप्निल कदम -कुडाळ :
चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीमधील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सन २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षेत कु. यश विलास पेडणेकर यांनी ९०.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. जनार्दन विजय बिडये यांनी ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. भूमिका वामन भरडकर यांनी ८३.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला.
तसेच चेंदवण केंद्रात प्रथम क्रमांक अथर्व विलास मठकर, द्वितीय क्रमांक यश विलास पेडणेकर आणि तृतीय क्रमांक श्रुतिका सचिन परब यांनी मिळविल्याबद्दल त्यांचा रोख पारितोषिक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांना रोख रक्कम, छत्री तसेच विविध आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा विविध दानशूर व्यक्ती, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई तसेच विविध मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमासाठी कुडाळ येथील सनदी लेखापाल यतिन जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण पोयरेकर होते. यावेळी उपाध्यक्ष शरद शुंगारे, सचिव अशोक राऊत, खजिनदार अरुण अमरे, संस्था सदस्य, शाळा समिती सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव अशोक राऊत यांनी केली. संतोष सांगळे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक माणिक पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचा हा गौरवशाली क्षण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.












