बळीराजा सुखावला, रोपांना संजीवनी
राजापूर (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून लांबलेल्या मान्सूनने अखेर सोमवारी सायंकाळ पासून तालुक्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यात ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र मान्सून सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला असून पावसा अभावी सुकलेल्या रोपांना संजीवनी मिळाली आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात काही पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. मात्र प्रशासनाने तात्काळ या घटनांची दखल घेत पंचनामे केले असून रस्त्यावर पडलेली झाडे बाजुला हटवून वाहतुकही सुरळीत केली आहे.
सोमवार पासून तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनामुळे खरीप हंगामाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरलेल्या रोपांना पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात महावेध पर्जन्यमापनाप्रमाणे सोमवारी सरातरी ६५.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदा मृग नक्षत्र उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेकांनी नांगरणी व मशागतीची कामे पूर्ण करूनही पावसाअभावी पेरणी लांबणीवर टाकली होती. त्यामुळे भात लागवडीसह इतर खरीप पिकांच्या नियोजनावर परिणाम झाला होता.
मात्र सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळपासून तालुक्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचू लागल्याने भात पेरणी व रोपवाटिकेच्या कामांना गती मिळणार आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ओढे-नाले वाहू लागले असून जलस्रोतांच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमवारी दुपारी पन्हळे तर्फे सौंदळ सावंत बाग जवळ महामार्गावर झाड कोसळून पडल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती मात्र प्रशासनाने तातडीने झाड बाजुला करून वाहतुक सुरळीत केली. तर मौजे नाटे येथे नाटे नगर विद्यामंदिर नाटे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय च्या समोर पाऊस व वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने धारतळे – नाटे मुख्य रस्त्याची वाहतूक ठप्प झाली होती. मात्र याचीही तात्काळ दखल घेत प्रशासनाने झाड बाजुला करून वाहतुक पुर्ववत केली. तर मौजे कोंडसर येथील लोणवी वाडी मधील जनार्दन धकटु दळवी यांच्या गुरांच्या गोठ्यावर झाड उन्मळून पडल्याने गोठ्याचे मोठे नुकसान झालें आहे कोणतीही जीवितहानी नाही. तात्काळ प्रशासनाने याचा पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.
हवामान विभागाने दिलेला ईशारा व वादळी वाऱ्यास होणारा पाऊस लक्षात घेऊन प्रशासकिय यंत्रणा अलर्ट झाली असून तहसीलदार विकास गंबरे यांनी सर्व प्रशासकिय विभागांना सतर्क रहाण्याच्या सुचना दिल्या आहेत.
पहिल्याच पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू
राजापुरात पाऊस सुरू होताच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी भर पावसातही विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाऊस सुरू होताच विजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सोमवारी व मंगळवारी विजपुरवठा वारंवार खंडीत होत होता.












