गुहागरात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम

अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये अनेक ठिकाणी आपत्तीच्या घटना सुरू आहेत.सोमवारी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी देखील आपला जोर कायम ठेवला होता.दरम्यान या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली.
मौजे पाचेरीसडा येथील पानबुडी फाटा-मधलीवाडी रस्त्यावर काजू झाडाची फांदी वादळी वाऱ्यामुळे कोसळून वाहतूक बंद झाली. ग्रामपंचायत वेलदूर अंतर्गत नवानगर येथील प्रमोद वणकर यांचे शौचालय व घरची भिंत पावसामुळे पडून नुकसान झाले आहे. नवानगर येथील छाया दाभोळकर यांच्या घरासमोरील भिंत कोसळली आहे. नरवण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रोहिले महसूल गावातील प्रसाद पिलणकर यांचे घरावर माडाचे झाड पडले आहे. मौजे रोहिले येथील चंद्रकांत यशवंत पिलणकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडून अंशतः नुकसान झाले आहे. तळवली येथे देखील न्यू इंग्लिश स्कूल तळवली येथे रस्त्यावर विजेचा खांब कोसळून वाहतूक काही काळ खोळंबली होती.मात्र लगेचच ती पूर्ववत करण्यात आली.
तर गाव चिखली कदमवाडी येथील अशोक पुंडलिक गोयथळे यांच्या घराजवळील सुपारीचे झाड पडून घरावरील सिमेंट पत्रे फुटून अंशतः नुकसान झाले. दि. 22 जून रोजी मौजे जांभारी येथील जितेंद्र आग्रे यांच्या विहिरीचे अंशतः नुकसान झाले. तालुक्यातील संपूर्ण आपत्ती परिस्थितीवर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर उद्या बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.