ज्योती लक्ष्मण भोसले यांच्याकडून बिजघर नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

खेड : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई प्रभादेवी येथील माजी नगरसेविका तथा शिव आरोग्य सेनेच्या सचिव आणि सुश्रुषा हॉस्पिटलच्या संचालिका ज्योती लक्ष्मण भोसले यांनी खोपी विभागातील सात गावांमधील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाचा शुभारंभ बिजघर नं. १ शाळेत करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत आणि त्यांचा शैक्षणिक विकास अधिक सक्षम व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे ज्योती भोसले यांनी सांगितले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे खेड तालुका अध्यक्ष विजय येरुणकर, बिजघर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, अध्यक्ष भगवान जंगम, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भोसले, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्योती लक्ष्मण भोसले या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत असून त्यांच्या या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे सातगाव परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेल्या या मदतीमुळे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.