सावंतवाडी : शहरातील गजबजलेल्या गवळी तिठा परिसरात गुरुवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गवळी तिठा परिसरात एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत पडली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, ती व्यक्ती मृत असल्याचे समजले. यानंतर स्थानिकांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. संबंधित मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ती व्यक्ती कोण आहे, कुठून आली होती आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत गूढ कायम आहे.
पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे तसेच दुकानदारांकडे चौकशी सुरू केली असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.












