रत्नागिरी जिल्ह्यात २६ ते ३० जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

दापोली कृषी विद्यापीठाकडून शेतकाऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला जारी

रत्नागिरी: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक २६ ते ३० जून २०२६ या कालावधीत बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी मौसम सेवेमार्फत जिल्ह्यासाठी विशेष कृषी सल्ला पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तापमान आणि हवामान अंदाज
अंदाज कालावधीत जिल्ह्याचे कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. २४ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण २६२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERFS) ३० जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीतही कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामानाचा इशारा

२६ जून: जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो.

२७ ते २९ जून: तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

भात आणि नागली रोपवाटिका: ज्या भागात भात आणि नागली/वरी रोपवाटिकांची पेरणी अपूर्ण आहे, त्यांनी गादी वाफ्यावर पेरणी पूर्ण करावी. भात रोपवाटिकेसाठी प्रति गुंठा १ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश (किंवा ३.३३० किलो सुफला) जमिनीत मिसळावे. बियाण्यास पेरणीपूर्वी २.५ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. रोपे लवकर तयार होण्यासाठी ‘रहू’ पद्धतीने (मोड आणून) पेरणी करावी आणि रोपवाटिकेत पाणी साचणार नाही याची काळजी घेऊन अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

तण नियंत्रण व फवारणी: पेरणीनंतर दोन दिवसांनी प्रति गुंठा ५-६ लिटर पाण्यात पेंडीमेथालिन ३० ईसी (३३.३ मि.ली.) किंवा ऑक्साडायार्जिल ८० डब्ल्यूपी (१.२५ ग्रॅम) ची फवारणी करावी. पावसाची तीव्रता पाहून, ३-४ तासांची उघडीप असतानाच द्रावणात स्टिकर (चिकटणारा पदार्थ) मिसळून फवारणी करावी.

फळबागा व नवीन लागवड: मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे नुकसान टाळण्यासाठी नव्याने लागवड केलेल्या आंबा, काजू कलमांना तसेच सुपारी व नारळ रोपांना काठ्यांचा आधार द्यावा. आंबा आणि नारळाच्या झाडांना द्यावयाची खतांची मात्रा पावसाचा जोर कमी असताना किंवा उघडीप पाहूनच द्यावी. नवीन लागवडीसाठी विद्यापीठाच्या किंवा प्रमाणित रोपवाटिकेतूनच निरोगी कलमे खरेदी करावीत आणि लागवड करताना कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील याची दक्षता घ्यावी.

भुईमूग, कारळा व भाजीपाला:*भुईमुगाची पेरणी टोकण पद्धतीने तर कारळा पिकाची पेरणी बारीक वाळू मिसळून योग्य अंतरावर करावी. वेलवर्गीय भाजीपाला (काकडी, पडवळ, दोडका, कारले इ.) पेरणी करताना प्रत्येक आळ्यात २ किलो शेणखत व ५०-६० ग्रॅम सुफला द्यावे; तसेच खोडकुज रोखण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा.

पशुसंवर्धन व कुक्कुटपालन सल्ला
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांना झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात किंवा शेडमध्ये ठेवावे. तसेच, कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून घ्याव्यात जेणेकरून पक्षांचे पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ केंद्र किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.