मुंबई येथे 29 जून रोजी होणाऱ्या ग्लोबल चेस लीगच्या सीझन 4 प्लेयर ड्राफ्टकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगामात मॅग्नस कार्लसन पुनरागमन करत असून FIDE महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मुख्य स्पर्धा 3 ते 13 सप्टेंबरदरम्यान बेंगळुरू येथे रंगणार आहे. जगातील नामांकित ग्रँडमास्टर्सच्या उपस्थितीमुळे यंदाचा हंगाम अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. सहा फ्रँचायझी संघांच्या सहभागामुळे स्पर्धेची उत्सुकता अधिक वाढली आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक आणि प्लेयर ड्राफ्टची रचना
मुंबई : ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या हंगामाचा प्लेयर ड्राफ्ट 29 जून रोजी मुंबई येथे पार पडणार असून, मुख्य स्पर्धा 3 ते 13 सप्टेंबरदरम्यान बेंगळुरू येथे आयोजित करण्यात येणार आहे. अंतिम सामना 13 सप्टेंबर रोजी होणार असून त्यातून नव्या विजेत्याची घोषणा केली जाईल. या लीगमध्ये सहभागी असलेल्या सहा फ्रँचायझी प्रत्येकी सहा खेळाडूंचा संघ तयार करतील. प्रत्येक संघात एक आयकॉन प्लेयर, दोन सुपरस्टार पुरुष, दोन सुपरस्टार महिला आणि एक प्रॉडिजी खेळाडू असणे बंधनकारक आहे. लीगमध्ये सहा-बोर्ड रॅपिड फॉरमॅट वापरला जात असून प्रत्येक बोर्डला समान महत्त्व दिले जाते.
कार्लसन, दिव्या देशमुखसह दिग्गज खेळाडूंचा सहभाग
यंदाच्या सीझन 4च्या खेळाडूंच्या यादीत जगभरातील 36 ग्रँडमास्टर्स सहभागी आहेत. यामध्ये मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, जावोखिर सिंदारोव, कोनेरू हंपी, अलेक्झांड्रा कोस्टेनियुक, इयान नेपोम्नियाची, लेव्हॉन अरोनियन, व्होलोदर मुर्झिन, लिओन ल्यूक मेंडोन्का आणि दिव्या देशमुख यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मॅग्नस कार्लसन मागील हंगामाला मुकल्यानंतर यंदा पुनरागमन करत आहे, तर दिव्या देशमुख प्रथमच या फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
यंदाच्या हंगामात अपग्रेड मुंबा मास्टर्स, Fyers American Gambits, गंगा ग्रँडमास्टर्स, त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स, पीबीजी अलास्कन नाइट्स आणि अल्पाइन एसजी पायपर्स हे सहा संघ मैदानात उतरतील. गतविजेता अल्पाइन एसजी पायपर्स विजेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या सहभागामुळे आणि स्पर्धात्मक स्वरूपामुळे यंदाची ग्लोबल चेस लीग अधिक रोमांचक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रहार डिजिटल









