कोकण विकासाचे मारेकरी…!

कोकण विकासाचे मारेकरी…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

फक्त कोकणात कोणता नवीन प्रकल्प यायचा म्हटले की त्याला विरोध करणारे काही ठराविक राजकिय नेते, पुढारी पुढे येतात. अणुउर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प न येताही गेल्या दोन-पाच वर्षात आंबा, काजू पिकांची अनियमितता आहेच ना ! यावर्षी तर आंबा पिकाचे तीनतेरा वाजले. कोणताही औष्णिक/ अणूउर्जा प्रकल्प न येताही घडलय. इथे कोणत्याही प्रकल्पाचे समर्थन आम्ही बिल्कुल करत नाही. परंतु काहीच नको म्हणण्याचा प्रकार जो काही सुरू आहे तो आजवर कोकणविकासाला मारकच ठरला आहे…

महाराष्ट्रातील कोकण प्रांत हा खऱ्या अर्थाने निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला समृद्ध प्रांत. कोकणातील जे काही निसर्गाने दिलयं त्यावर समाधानी वृत्तीने जीवन जगण्याचा कोकणी माणसांचा स्वभाव आणि प्रयत्न रहातो. महाराष्ट्रात उर्वरित भागांपेक्षा कोकणच्या वाट्याला फारस कधी काही मिळालं नाही. सत्तास्थानी असणारे नेहमी कोकणाला सावत्रपणाचीच वागणुक देत राहिले. अनेकवर्षे सत्तास्थानी आणि त्याचे वाटेकरी पश्चिम महाराष्ट्र राहीला. त्यामुळे कोकणाकडे फार कोणी लक्ष दिले नाही.
ऊसाच्या माध्यमातून साखर कारखानदारी उदयास आली. या ऊस शेती आणि साखर कारखानदारीतून निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रात सहकारक्षेत्र रूजल आणि फोफावले. साखर कारखानदारासोबतच दूधाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणण्याचा प्रयत्न त्या भागाने केला. मुळातच विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात स्वभावत: सहकाराची वृत्ती आहे. आधी काय तरी उभे करूया मग काय असेल पहाता येईल. या सकारात्मकतेमुळे विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र वाढले. दूधाच्या पूरक व्यवसायाने पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दोनवेळची चूल पेटण्याची चिंता राहीली नाही. आणि या सगळ्याच्या जोडीला अधिकाधिक कष्ट घेण्याची त्यांची मानसिकता राहीली. पाण्याचे योग्य नियोजन त्यातून शेतीकडे अधिक लक्ष केंद्रित करत शेतात राबणाऱ्यांची संख्या आपोआपच वाढली. उच्च शिक्षण घेत असलेल्याला देखिल शेतीत राबायला कमीपणा वाटत नाही. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भौगोलिक स्थिती ही शेतीला पूरक आहे. त्याला तिथल्या लोकांची मेहनत आणि कष्टाची जोड आहेच. त्या-त्या भागात विकासाचा आलेख उंचावलेला दिसतो.
बऱ्याचवेळा महाराष्ट्रातील विकासाची चर्चा होताना बारामतीच नाव घेतलं जातं. राज्यात बारामती विकास प्रक्रियेत निश्चितच कोणीही नाव घ्यावं असचं आहे. यात संदेह नाही. परंतु या सगळयात महत्वाची बाब अशी आहे राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री कै.अजित पवार हे गेली अनेकवर्षे सत्तेतच आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या वर्षानुवर्षे पवार यांच्याकडेच राहील्या आहेत. त्यामुळे बारामतीला विकासात नेहमीच महाराष्ट्राच्या तूलनेत झुकते माप दिले गेले. कोकण आणि बारामती अशी तूलना कधी कोणाला करायची झाली तर एका गोष्टीचा जरूर विचार करावा. चर्चा करावयाची झाली तर बारामतीत, उर्वरित महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पाला नव काही होत असेल तर त्याला विरोध न करता तो प्रकल्प आपल्या भागात कसा उभा होईल यासाठी तिथल्या नेतृत्वाने प्रयत्न केले तर जनता खंबीरपणे पाठीशी उभी रहाते. याउलट कोकणात कोणताही विकासाचा विषय सुरू झाला काय होतयं असं कोणी म्हटलं की त्याला विरोध करणारे विरोधी सूर लावणारे काही ठराविक चेहरे आहेतच. हा विरोध करताना केवळ त्याच्यामागे राजकारणाचा भाग असतो. अफवा आणि बदनामीचे षड:यंत्र निर्माण करणारे काही राजकिय, सामाजिक कार्यकर्त्यांचे एकमेव काम रहात. विरोधात उभे रहाणाऱ्या अनेकांना आपण का? कशासाठी विरोध करतोय याचीही पुरेशी माहिती नसते. कोणतरी विरोध करतात म्हणून आपण त्यांच्या सूरात सूर मिसळण्याचा प्रकार सुरू असतो. काही संस्था या परदेशी फंडीग वरती चालतात. त्या संस्थेत काम करणारे कार्यकर्ते विरोधी वातावरण तयार करणे आणि विकासाला विरोध करणे या एकमेव गोष्टींसाठी त्यांना परदेशातून निधी उपलब्ध करून दिला जातो. यात सगळयात महत्वाची बाब म्हणजे या सगळयामध्ये राजकिय हिशोब असतात. निवडणुकीत आपल्याला किती फायदा होईल व तो निवडणुकीत फायदा घेण्यासाठी वाट्टेल त्या पद्धतीने अफवा पसरवल्या जातात. ही आजवरची कोकणातील वस्तुस्थिती आहे. जे विरोधासाठी विरोध करतात त्यांनी एखादा कोकण विकासाचा प्रकल्प आणला आहे. त्यांच्या पुढाकाराने काही उभं राहिलयं असं गेल्या अनेक वर्षात काही घडल नाही.
फक्त कोकणात कोणता नवीन प्रकल्प यायचा म्हटले की त्याला विरोध करणारे काही ठराविक राजकिय नेते, पुढारी पुढे येतात. अणुउर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प न येताही गेल्या दोन-पाच वर्षात आंबा, काजू पिकांची अनियमितता आहेच ना ! यावर्षी तर आंबा पिकाचे तीनतेरा वाजले. कोणताही औष्णिक/ अणूउर्जा प्रकल्प न येताही घडलय. इथे कोणत्याही प्रकल्पाचे समर्थन आम्ही बिल्कुल करत नाही. परंतु काहीच नको म्हणण्याचा प्रकार जो काही सुरू आहे तो आजवर कोकणविकासाला मारकच ठरला आहे. सी वर्ल्ड सारखा कोकणच अर्थकारण बदलणारा प्रकल्प होऊ दिला नाही, पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाची सुरूवात गेली ३२ वर्षे थांबवली गेली. चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार होता. परंतु हे सर्व प्रकल्पाच्या आडून जे राजकारण करण्यात आले त्यावरही कधीतरी कोकणवासियांनी विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. स्वत: काहीही विकासात एक पाऊल पुढे टाकण्याची ज्यांची कुवत कधी दिसली नाही अशांकडुनच सातत्याने बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो ही वस्तुस्थिती आहे. विरोधासाठी फक्त विरोध करण्याच्या भुमिकेने आणि मानसिकतेने कोकणचे नुकसानच झाले आहे. एकिकडे विनाशकारी प्रकल्प नको म्हणताना पर्यटन व्यवसायाला चालना देणारा पुरक ठरणारा एखाद्या प्रकल्पाची चर्चा झाली की त्यालाही विरोध करायचा अशा दुटप्पी भुमिकेने कोकणात काही उभं रहाण्यापूर्वीच केवळ विरोधी चर्चेने मोडून घालण्याच काम करण्यात आले आहे.
रोजगाराची, बेकारीची चर्चा सुरू झाली की कोकणात बेकारीसाठी सत्ताधारी काही करत नाहीत असं म्हणायचे. यामुळेच कोकणात आयटी प्रकल्प नाही की गारमेंट प्रकल्प उभा राहू शकला नाही. आज हजारो तरूण मुल-मुली पुणे, मुंबई, नाशिक या शहरांमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करताना दिसतात. कोकणातील असंख्य घरांमध्ये वृद्ध आजी-आजोबा आहेत. अनेक घरांमध्ये कोणीच रहात नाहीत. बंद घरांची संख्या कोकणात वाढत आहेत. असंख्य तरूण-तरूणींना कोकणातील शहरांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असेल तर ती हवी आहे. अनेक तरूणांना कोकणात राहूनच नोकरी करायची आहे. प्रत्येक गोष्टीत विरोध करणाऱ्यांनी कधीतरी या सर्वांचा विचार केला पाहिजे. राजकारणात राणेंना ज्यांना विरोध करायचा असेल त्यांनी तो खुशाल करावा. गेली तीसवर्षे राणे विरोधाचा हा सीलसीला कोकणाने पाहिलाय, अनुभवलाय त्यामुळे राणेंना राजकिय विरोध समजून घेता येईल. परंतु विकासाला विरोध करण्याची भुमिका योग्यच नाही. कोकणातील जनतेनेच यासर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगल आणि वाईट याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर कोकण आणखी खुप मागे जाईल. बारामतीच्या गजाली करून कोकणचा विकास होणार नाही. त्यासाठी जनतेची सकारात्मक मानसिकता आणि विकासाला पोषक वातावरण आणि जनतेच समर्थनही आवश्यक आहे.