गोवा – सिंधुदुर्ग ट्रक वाहतूकदार व खाण व्यावसायिक वादात आ. निलेश राणे यांची मध्यस्थी

आठ दिवसांत सर्व संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढणार

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकाराने गोव्यात महत्त्वपूर्ण बैठक

​सावंतवाडी । प्रतिनिधी :

गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरे, रेती आणि खडी वाहतूक करणारे ट्रक व्यावसायिक तसेच सिंधुदुर्गातील चिरेखाण व्यावसायिक यांच्यात निर्माण झालेला मतभेद आणि संघर्षाची परिस्थिती आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना नेते तथा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या गंभीर प्रश्नावर येत्या आठ दिवसांच्या आत सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

​गोव्यातील पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही राज्यातील व्यावसायिक, संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गोवा राज्यातील ट्रक असोसिएशनच्या वतीने आमदार निलेश राणे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
​ ​या बैठकीत गोव्यातील ट्रक, रेती, चिरे आणि खडी व्यवसायिकांनी सिंधुदुर्गातून माल आणताना आकारले जाणारे वाढीव दर, विविध शुल्क आणि त्यामुळे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडेनासा झाल्याची व्यथा मांडली. स्थानिक व्यावसायिकांकडे स्वतःच्या खाणी आणि वाहने असल्याने त्यांना व्यवसाय करणे शक्य होते, मात्र गोव्यातील ट्रक मालकांसाठी वाढत्या खर्चामुळे हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. अनेक ट्रक मालकांनी व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचे सांगत जांभा दगड चिऱ्यांचे भाव अधिक असल्याकडे लक्ष वेधले. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी, हा केवळ व्यवसायाचा प्रश्न नसून शेकडो ट्रक मालक, चालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचे सांगत तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

आठ दिवसांत तोडगा काढणार: आमदार निलेश राणे
​व्यावसायिकांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सकारात्मक आश्वासन दिले. ते म्हणाले, “गोवा आणि सिंधुदुर्गचे नाते अनेक वर्षांपासून अतूट असून ते आई-मावशीसारखे आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांना न्याय मिळेल असा समन्वय आम्ही साधू.”
​येत्या आठ दिवसांच्या आत सिंधुदुर्गातील रेती व खाण व्यवसायिकांची स्वतंत्र बैठक घेऊन, सर्व बाजू समजून घेत योग्य निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांचे हित जपणारा तोडगा काढला जाईल, असा शब्द आमदार राणे यांनी दिला.

​आमदार प्रवीण आर्लेकर यांचा पुढाकार
​याप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, या विषयावर यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीतही बैठक झाली होती, मात्र काही कारणांमुळे प्रश्न कायम राहिला. ट्रक व्यवसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्याशी थेट संपर्क साधून ही बैठक आयोजित करण्यात आली. गोवा–सिंधुदुर्गमधील व्यापार सुरळीत सुरू राहावा हाच आमचा उद्देश असून लवकरच सर्वांना मान्य होईल असा तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​प्रमुख उपस्थिती

​या बैठकीत दोन्ही राज्यांतील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यावर आणि वाहतूक व्यवसायातील अडथळे दूर करण्यावर एकमत झाले. याप्रसंगी गोव्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये, सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांच्यासह दोन्ही राज्यांतील अनेक व्यावसायिक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित सर्व व्यावसायिकांनी आमदार राणे आणि आमदार आर्लेकर यांच्या भूमिकेचे स्वागत करत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.