रस्त्यातील खड्डा बुजावल्याने अनेक अपघात वाचले.
गौरव पोंक्षे माखजन:
शाळेमध्ये अनेक मूल्य शिकवली जातात.संस्कार केले जातात.पण ही मूल्य जर दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापरात आली तर रुद्र गुरव सारखे आदर्श तयार व्हयला वेळ लागत नाही.
आरवली माखजन मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.तू मोठा की मी मोठा अस म्हणत खड्ड्यांची जणू स्पर्धाच लागली आहे.याचं रस्त्यावर सरंद येथे मराठी शाळेनजीक फुटाहून अधिक खोली असलेला,पूर्ण रस्ता व्यापणारा,काँक्रिट च्या रस्त्या जवळ खड्डा पडला होता.या खड्ड्यांवर अनेक बातम्या प्रसारीत झाल्या,लोकांनी बरीच ओरड केली. स्थानिक लोकांप्रतिनिधी थकले. परंतु खड्डे काही बुजवले जात नव्हते.सरंद येथे वारंवार खड्ड्यात असलेल्या पाण्यामुळे,खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकिस्वार पडत होते.चारचाकी गाड्या आपटत होत्या,काही हेलपाटतं होत्या.ह्या रस्त्याचे खड्डे बुजवायचेच नाहीत असा जणू आदेशच असल्यासारख सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे.
रस्त्यावरील पडलेला खड्डा नजिकच राहणाऱ्या रुद्र गुरव याला खुणावत होता.त्याचा ज्येष्ठ बंधू रुपेश गुरव या दोघांना वारंवार होत असलेले अपघात पाहवत नव्हते.शासन काहीच करत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी हा खड्डा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला.चिऱ्याचा डबर,खडी या सहाय्याने तो खड्डा भरून काढला.केवळ सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने रुद्र गुरव आणि रुपेश गुरव यांनी हे काम केले.या कामाचा गाजावाजा नाही किंवा फोटो बाजी नाही.समजाकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता निस्वार्थ केलेल्या कार्यासाठी कोणा व्यक्तीला, खर तर प्रसिद्धीची, मुळीच भूक नसते.
स्वयं प्रेरणेने रुद्र गुरव आणि रुपेश गुरव हे दोघे बंधू मोठ्या मेहनतीने हे काम करत आहेत हे अचानक तेथून जात असताना, दिसल्यावर गावातील प्रतिष्ठित नागरिक कुलदीप भागवत यांनी कौतुक केले.व त्यांच्या नकळत गाडीतूनच व्हिडीओ काढून गुरव बंधूनी केलेले काम खरंच आदर्श असल्याचे सांगत सर्वांसमोर आणले.
रुद्र हा माखजन इंग्लिश स्कूल मध्ये दहावी अ मध्ये शिक्षण घेत आहे.तर रुपेश हा शाळेचा माजी विद्यार्थी आहे.त्यांच्या ह्या कृती मुळे संभाव्य होणारे अनेक अपघात वाचले आहेत.कुणास ठाऊक या खड्ड्यामुळे मनुष्य हानी देखील झाली असती.आपण अशी कामे करताना काढलेली अनेक रील्स् बघतो.पण रुद्र आणि त्याचा भाऊ रुपेश हे रिअल हिरो झाले आहेत.
रुद्र ने केलेल्या कामाची माहिती ज्यावेळी शाळेत कळली त्यावेळी.रुद्र आणि त्याच्या भावाचे तोंड भरून कौतुक केले.व सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र करत रुद्र चा सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असे ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक महादेव परब यांचे हस्ते बुके देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे,रुद्र चे वर्गशिक्षक महादेव शिंदे,संतोष कुलकर्णी, मानसी कोवळे,आदिंसह अन्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रुद्र आणि त्याचा भाऊ रुपेश याचे कौतुक संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव श्रीकांत फाटक,उपाध्यक्ष राजेश फणसे व अन्य संचालक मंडळींनी देखील केले आहे.रुद्र आणि रुपेश यांचे माखजन पंचक्रोशीतून देखील अभिनंदन व कौतुक होत आहे.













