कोकणात पावसाचा जोर वाढणार; रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर!

मुंबई :
कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहतील असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज, म्हणजेच २९ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ३० जून ते ३ जुलै या पुढील चारही दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस रत्नागिरीकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २९ जून रोजी ‘यलो अलर्ट’ (वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस) देण्यात आला आहे. मात्र, ३० जूनपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढणार असून ३० जून, १ जुलै, २ जुलै आणि ३ जुलै या सलग चार दिवसांसाठी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मच्छीमार आणि किनारपट्टी भागातील नागरिकांनी समुद्रात न जाण्याचे तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.