कायदा विभागात घवघवीत यश; चिपळूणचा शैक्षणिक नकाशावर ठसा
चिपळूण (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ (कायदा विभाग) यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या एल.एल.एम. (LL.M.) पदव्युत्तर परीक्षेत चिपळूणची कु. दामिनी प्रीतम प्रशांत देवळेकर हिने विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या या यशामुळे चिपळूणचे नाव उज्वल झाले आहे. दामिनीच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अभिनेता ओंकार भोजने यांनी देवळेकर यांच्या निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार केला.
यावेळी नाटक कंपनीचे अध्यक्ष श्रावण चव्हाण, मानस संसारे, तिचे वडील प्रशांत देवळेकर, आई प्रीतम देवळेकर आदी उपस्थित होते. कु. दामिनी हिचे शालेय शिक्षण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. डी.बी.जे. कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर तिने एस.सी.एल.सी. कॉलेज, पुणे येथून एल.एल.बी. (LL.B.) पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या कायदा विभागातून बिझनेस लॉ या विषयात एल.एल.एम. पदवी घेतली. तिच्या चिकाटी, अभ्यासू वृत्ती व पालकांचे भक्कम पाठबळ यामुळे दामिनीने संपूर्ण विभागात सर्वोच्च क्रमांक मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चिपळूणसह पुण्यातील शैक्षणिक संस्थांकडून तीचा गौरव करण्यात येत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, ती कायदा क्षेत्रात भरीव योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













