राजापूर (प्रतिनिधी): राजापुरात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
राजापुरात सोमवार पासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने संततधार धरली होती. हा पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिला. बुधवारी दिवसभर राजापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने संततधार धरली होती. वादळी वारा व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी विजपुरवठा वांरवार खंडीत होत होता. मात्र भर पावसातही महावितरणकडून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

या पावसात ग्रामीण भागात काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आजिवली जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ वर मंगळवारी सायंकाळी वडाचे झाड कोसळून शाळेचे नुकसान झाले. शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सागवे गोठीवरे पारवाडी येथे विजवाहिन्या तुटुन पडल्या होत्या. महावितरणकडून तात्काळ काम हाती घेण्यात आले व विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
तसेच कोदवली साईनगर महापुरुष मंदिरा शेजारी मुल्ला यांचे घराशेजारी भले मोठे झाडं लाईट वायरवर पडुन चालू वायर रस्त्यावर पडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान हे झांड घरांवर पडले असून रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. चालू लाईट वायर रस्त्यावर असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
बुधवारी दिवसभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहातही वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागातील नद्या नाल्यांनाही पुर आला आहे.
महावितरणकडून भर पावसातही विजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न
राजापुरात गेले तीन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत होत आहे. काही ठिकाणी विजवाहिन्या तुटुन पडत आहेत, तर काही ठिकाणी पोलही पडत आहेत. मात्र महावितरणचे अधिकारी व कर्मचारी भर पावसातही विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
फोटो 1 आरजेपी 1।4
आजीवली येथे शाळेनजीक रस्त्यावर कोसळलेले झाड. तर दुसऱ्या छायाचित्रात कोदवली साईनगर येथे कोसळलेली वीजवाहिनी.












