स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे गांधर्व महाविद्यालयाच्या कथ्थक परीक्षेत उज्ज्वल यश

 

सावंतवाडी । प्रतिनिधी: येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’मधील विद्यार्थिनींनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथ्थक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेत शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. आद्या कुंभार हिने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ‘प्रारंभिक’ परीक्षेत प्रथम श्रेणी (First Class) पटकावली. तसेच, इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. हीना सारंग हिनेही उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत द्वितीय श्रेणी (Second Class) मिळवून यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेच्या कथ्थक शिक्षिका व संचालिका सौ. काश्मिरा पाटणकर यांचे मोलाचे व तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले असल्याचे पालकांनी सांगितले.

या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर आणि मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे कौतुक करणारे पालक आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ. काश्मिरा पाटणकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस संस्थेच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.