दोडामार्ग पोलिसांची धडक कारवाई: साटेली-भेडशी येथील घरफोडीचा गुन्हा उघड; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

​दोडामार्ग:सुहास देसाई

साटेली-भेडशी वरचीवाडी येथे अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेली मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलाचा श्वान ‘सनी’ आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी १९ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
​
​मौजे साटेली-भेडशी वरचीवाडी येथील रहिवासी फिर्यादी आशेशाव सालू रॉड्रीक्स यांचे भाऊ रोमाल शिलोरीयान फर्नांडीस यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला होता. २८ जून २०२६ च्या रात्री १०.०० ते २९ जून २०२६ च्या सकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. चोरट्यांनी घरातून ३,०७,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी २९ जून रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१(४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत करत होते.

​श्वान ‘सनी’ आणि पोलिसांची कामगिरी

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदार आणि सिंधुदुर्ग पोलीस दलाचा गुन्हे अन्वेषण श्वान ‘सनी’ याच्या मदतीने पोलिसांनी हर्ष सूर्यकांत नाईक (वय १९ वर्षे, रा. साटेली-भेडशी, ता. दोडामार्ग) या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

​पोलिसी खाक्या दाखवताच हर्ष नाईक याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीत चोरीला गेलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

​या पथकाने केली कामगिरी
​सदरची यशस्वी कामगिरी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीम. नयोमी साटम, दोडामार्गचे पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र पाटील, सपोनि श्री. मागाडे, पोउनि श्री. आशिष भगत, पोलीस हवालदार वसंत देसाई (७११), विठोबा सावंत (१०८७), विक्रम गवस (१२६), बाळकृष्ण गवस (९४८), अंकुश नाईक (४८८) तसेच पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव (१२८३), परशुराम सावंत (७१) आणि गावडे (६६५) यांनी केली.

​अवघ्या काही दिवसांतच घरफोडीचा छडा लावून मुद्देमाल जप्त केल्यामुळे दोडामार्ग पोलिसांचे तालुक्यात कौतुक होत आहे.