दापोलीत सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली (विशेष प्रतिनिधी) : जालगांव येथील सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन काल माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विषयांवरील प्रात्यक्षिके, मॉडेल्स आणि वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित कल्पक प्रकल्प पाहण्याची संधी मिळाली.
या विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळते. इतिहासातील अनेक घटनांमध्येही विज्ञान दडलेले असल्याचे सांगताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याधुनिक साधनांची उपलब्धता नसतानाही उभारलेले किल्ले आजही विज्ञानाचे उत्तम उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील लहान–सहान गोष्टींतही विज्ञानाचा पाया दडलेला असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना हा दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा, विशेषतः एआयचा वाढता वापर लक्षात घेता सायबर फ्रॉडची वाढती समस्या गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटीबाबत जागरूकता वाढविण्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दापोलीतील विद्यार्थी आपल्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख नक्कीच निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. किशोरजी देसाई, तालुकाप्रमुख श्री. उन्मेशजी राजे, महिला तालुका संघटक श्रीमती दिप्ती निखार्गे, दापोली नगराध्यक्ष सौ. कृपाताई घाग, माजी समाजकल्याण सभापती श्री. भगवानजी घाडगे, सरस्वती विद्यामंदिरचे अध्यक्ष श्री. समीरजी गुजराथी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश सागवेकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.