परमे येथील शिवाजी जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन; परिसरात हळहळ

दोडामार्ग l प्रतिनिधी :परमे येथील रहिवासी शिवाजी लक्ष्मण जाधव (वय ३५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने परमे गावासह संपूर्ण साटेली भेडशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवाजी जाधव हे गेल्या महिनाभरापासून आजारी होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सुरुवातीला स्थानिक व इतर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील तात्काळ व अधिक उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवाजी जाधव हे अत्यंत मनमिळाऊ, शांत आणि संयमी स्वभावाचे होते. आपल्या मित्रपरिवार तसेच नातेवाईकांच्या सुख-दुःखात नेहमी हिररीने धावून जाणारे एक उमदे नेतृत्व म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या अशा अकस्मात जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण, काका-काकी, चुलत भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. परमे येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.