ओरोस येथे दीड कोटींच्या गोवा बनावटीच्या दारूसह ट्रक जप्त

एलसीबीची मध्यरात्री धडक कारवाई; राजस्थानातील चालक अटकेत, १.१५ कोटींचा मद्यसाठा जप्त

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी :

 

गोव्याकडून महाराष्ट्रात व अन्य राज्यात गोवा बनावटीचे विदेशी मध्य बेकायदेशीरपणे व राजरोजपणे महामार्गावरून जात असल्याचे उघड आहे. सध्या सिंधुदुर्ग पोलिसांनी ही पकड मोहीम सक्रिय केली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अनेक छापे यशस्वी होत आहेत.

ओरोस येथे शनिवारी पहाटे महामार्गावर केलेल्या छापेमारीत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा मध्ये साठा वाहतूक होत असताना कंटेन सह जप्त केला आहे.

गोवा ते मुंबई मार्गावर अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत एक कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत राजस्थानातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार, ४ जुलै रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस येथे ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याच्या ताब्यातील टाटा सिग्मा दहा चाकी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळून आली.

या कारवाईत दारूसह ३५ लाख रुपयांचा टाटा सिग्मा ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर व ऋषिकेश टोपले यांनी ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.