सावंतवाडी:येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने नेमळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक आर. के. राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक वाय. पी. नाईक यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. आर. के. राठोड यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्ञानदीप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आर. के. राठोड यांनी क्रीडा शिक्षक म्हणून तब्बल २८ वर्षे उत्तम सेवा बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा प्रकारांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य स्तरावर यश मिळवून विजेतेपद पटकावले आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत असून, त्यांचा ज्ञानदीप मंडळाला सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
ज्ञानदीप मंडळ गेल्या २० वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंतांचा गौरव करत आहे. कामाची प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी कौतुकाची थाप अत्यंत महत्त्वाची असते, याच उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक आर. के. राठोड यांनी ज्ञानदीप मंडळाने केलेल्या या सन्मानाबद्दल व कौतुकाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.













