देवरूख मातृमंदिर चौकाजवळ विद्युत वाहिनीवर वडाचे झाड कोसळले; वीजपुरवठा खंडीत
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यात रविवारी मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली. दिवसभर जोरदार पाऊस बरसत होता. या मुसळधार पावसामुळे देवरूख मातृमंदिर चौकाजवळ विद्युत वाहिनीवर वडाचे झाड कोसळले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर निवेबुद्रुक ते पांगरी मार्गावरील मुख्य विद्युत वाहिनीचे खांब कोसळले. परिणामी परिसराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
गेले काही दिवस तालुक्यात दमदार पाऊस बरसत असून नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बळीराजाही सुखावला असून लावणीच्या कामांनी वेग घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशातच रविवारी तालुक्यात मुसळाधारेने बरसायला सुरूवात केले. सकाळपासून या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे देवरूख येथील मातृमंदिर चौकाजवळ वडाचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळले त्यामुळे. विद्युत तारा तुटल्या. परिणामी बोटकेवाडी, कांगणेवाडी, पद्मराजा अपार्टमेंट, हायस्कूल रोड, कॉलेज रोड, मातृमंदिर परिसर, केदारी अपार्टमेंट, वेद अपार्टमेंट व परिसराचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच देवरूख वरचीआळी व भायजेवाडीकडे जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर काजूचे झाड कोसळले. त्यामुळे नीलकंठेश्वर, भायजेवाडी नाका व परिसराचा विद्यूत पुरवठा खंडित झाला होता.
त्याचबरोबर निवेबुद्रुक ते पांगरी मार्गावरील मुख्य विद्युत वाहिनीचे दोन खांब (पोल) कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.या बिघाडामुळे अनेक गावे अंधारात असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत वाहिनी कोसळल्यामुळे पांगरी, तुळसणी, घोडवली, वांयगणे, कर्ली, देवघर आणि निवे बुद्रुक यांसह परिसरातील जोडलेल्या अनेक गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या देवरुख ग्रामीण विभागाचे कर्मचारी आणि तांत्रिक टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. व कोसळलेले खांब हटवून नवीन खांब उभारण्याचे आणि विद्युत वाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.












