चिपळूणात दमदार पाऊस; वाशिष्ठी – शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ!

चिपळूण (प्रतिनिधी):- गेल्या चार-पाच दिवसांपासून चिपळुणात पाऊस चांगलाच पडत आहे. रविवारी तर पावसाचा जोर वाढल्याने वाशिष्ठी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या दोन्ही नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. चिपळूण शहरातील बाजारपुलाला वाशिष्ठी नदीचे पाणी टेकल्याने पावसाचा जोर आणखीन वाढला तर बाजारपूल परिसरात पाणी योजनेची शक्यता नाकारता येत नाही.

जून महिना पावसाचा कोरडा गेल्याने शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या दोन दिवस अगोदर पावसाने हजेरी लावली आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दमदारपणे पडत आहे. पहिले काही दिवस वाशिष्ठी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, गेल्या दोन- चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या दोन्ही नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. ग्रामीण भागातील वैतरणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची इशारा पातळी ५ मीटर आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत पाणी पातळी ४.२० मी. आहे. ही आकडेवारी पाहता वाशिष्ठी नदीची पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.