सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

घरांवर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान

महसूल विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू : नुकसान भरपाईची मागणी

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन नागरिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील सांगेली, आरोस-दांडेली, निगुडे, ओटवणे, आंबोली आणि चौकुळ या गावांना या पावसाचा मोठा फटका बसला. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही महसूल यंत्रणा ‘ऑन फिल्ड’ कार्यरत असून, तहसीलदार श्रीधर पाटील यांनी चौकुळ आणि सांगेलीसह इतर नुकसानग्रस्त भागाची स्वतः पाहणी करत बाधितांना धीर दिला.
​पावसामुळे तालुक्यात अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ४ जुलै रोजी चौकुळ येथील ३ घरे पूर्णतः कोसळली असून २७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. सांगेली येथेही १ घर पूर्णपणे पडले असून, येथील विष्णू सोमा राऊळ यांच्या राहत्या घरावर मोठे झाड कोसळल्याने घरातील साहित्यासह छप्पराचे सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेऊन घनावरील झाड बाजूला करण्यास मदत केली. निगुडे येथे देवकी वासुदेव गावडे यांच्या घरावर आणि गोठ्यावर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच, आंबोली गडदुवाडी येथील बाळकृष्ण गोविंद गावडे आणि ओटवणे येथील रामकृष्ण धनाजी गावकर यांच्या घरावर सागाचे झाड कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

​दुसरीकडे, आरोस-दांडेली परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. दांडेली येथील शेतकरी अमोल पुनाळेकर आणि परिसरातील इतर बागायतदारांची सुपारी, आंबा, केळी, साग आणि फणसाची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी चिंतेत ग्रासले आहेत. आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कै. भाऊ पांगम सभागृहाच्या इमारतीसमोर असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची भलीमोठी फांदी रात्रीच्या वेळी तुटून थेट सभागृहासमोर कोसळली. रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​वादळामुळे विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने विजे खांब आणि तारांचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्तांना तातडीने पुढील प्रशासकीय मदत दिली जाईल, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे. पीडित ग्रामस्थांकडून आता लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, ​तालुक्यातील मासूरे गावात अतिवृष्टीमुळे तब्बल ३ घरे पूर्णतः कोसळली असून २७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच सांगेली येथेही १ घर पूर्णपणे पडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
​या आपत्तीबाबत माहिती देताना सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले की, बाधित क्षेत्राची पाहणी केली जात असून महसूल विभागामार्फत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रशासकीय मदत दिली जाईल.