ग्राहक संघटनेच्यावतीने कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन
स्मार्ट मीटरला कडाडून विरोध
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले येथील वीज वितरण कार्यालय समोर आज सोमवारी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठीय्या आंदोलनात वीज ग्राहकांनी दररोज सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोबा बाबत आणि वीज वितरण कंपनी च्या गलथान कारभाराबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. तसेच स्मार्ट मीटर बसविण्यास ठाम विरोध दर्शविला. दरम्यान वीज ग्राहक संघटनेने ही या विरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
वेंगुर्ले तालुक्यात दररोज खंडित होणारा वीजपुरवठा, ग्राहकांना आलेली भरमसाट विजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती, वायरमनची कमतरता, वीज बिल ग्राहकांना दिली जात नाहीत, स्मार्ट मीटर मधील वीज बिल भरणा मुदत संपल्यावर आपोआप कट होणारा वीज पुरवठा बंद होतो ती चिप स्मार्ट मीटर मधून काढून टाकण्यात यावी, अशा विविध मागण्यासाठी हैं ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनामध्ये संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे, जिल्हा पदाधिकारी नंदन वेंगुर्लेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, सुधा कवठणकर, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक यांच्यासह तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्या वीज ग्राहकांसमोर वीज वितरणचे अधिकारी आल्यावर सर्वांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच केले नसल्याने सध्या सर्व ग्राहकांना विजेच्या खेळखंडोबाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नियमानुसार वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आली.
वीज वितरण कंपनीकडून फसवून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. मात्र यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. आम्हाला स्मार्ट मीटर नको. जर कोणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांना मार खावा लागेल असा इशाराही यावेळी उपस्थित ग्राहकांनी दिला.
दरम्यान तालुक्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, लाईन वर असलेली झाडी तात्काळ तोडून घ्यावी, वीज ग्राहकांना त्रास होणार नाही असे वर्तन वीज वितरण च्या अधिकाऱ्यांनी ठेवावे. ग्राहकांनी संपर्क केला तर त्यांना योग्य ते उत्तर द्यावे अशा विविध सूचना यावेळी ग्राहकांनी केले आहेत.













