​राजापुरात खैराच्या झाडांची मुळासकट चोरी; एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर :
राजापूर तालुक्यातील तळगाव पाटीलवाडी येथे सामाईक जमीन मिळकतीमधून बेकायदेशीरपणे खैराची झाडे चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०२५ सकाळी ९:०० ते ६ ऑगस्ट २०२५ दुपारी १७:३० वाजण्याच्या दरम्यान मौजे तळगाव येथील ‘गौळणमळी’ नजीक असलेल्या सर्वे नंबर २७६, ५ या सामाईक शेतजमीन मिळकतीत घडली. याप्रकरणी फिर्यादी भूषण विलास सावंत (वय ३४ वर्षे, व्यवसाय- शेती, रा. तळगाव पाटीलवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, संशयित आरोपी प्रताप संजय सावंत (वय ३१ वर्षे, रा. तळगाव पाटीलवाडी) याच्या विरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​आरोपीने फिर्यादीच्या वडिलांच्या मालकीच्या या सामाईक जमिनीतून ६,२२० रुपये किमतीची, सुमारे १० ते १२ वर्षे वयाची एकूण ४ खैराची झाडे चोरून नेली. यातील एक झाड कटरच्या साहाय्याने मुळापासून तोडले असून, उर्वरित तीन झाडे खड्डे खणून मुळासकट उपटून काढण्यात आली आहेत. याप्रकरणी ६ जुलै २०२६ रोजी रात्री २१:२३ वाजता राजापूर पोलिसांत गु.र.नं. १७७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.