लांजा नगरपंचायतीने जनरेटरद्वारे पाणी पुरवठा योजना चालवण्याची मागणी
संतोष कोत्रे
लांजा-: महावितरण च्या ढिसाळ आणि कर्तव्यशून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यात लांजा वासियांवर पाणी पाणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विजेअभावी नळपाणी योजना ठप्प पडल्याने अनेक प्रभागांमध्ये तीन ते चार दिवस पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.
दरम्यान, विजेअभावी नागरिकांची पाण्या वाचून होणारी तडफड लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत जनरेटरद्वारे नळ पाणी योजना सुरू ठेवण्याच्या दृष्टीने लांजा नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी लक्ष देणार का? तशी खबरदारी घेणार का? असा सवाल आता लांजा शहरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
लांजा नगरपंचायतीची नळ पाणी योजना या योजनेवर शहरासह विविध प्रभागातील हजारो नागरिक अवलंबून आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की नळपाणी योजना ठप्प होते आणि त्याचा थेट परिणाम हा लांजावासीयांच्या पाणी पुरवठ्यावर होतो. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी लांजा ही ग्रामपंचायत असल्यापासूनच हा प्रश्न आहे.
तत्कालीन ग्रामपंचायतीला निधी कमी असल्याने त्यावेळी ची परिस्थिती ठीक होती. परंतु आता लांजा ग्राम पंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध होतो. त्यामुळे लांजा वासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या पाणी या प्रश्नावर आता नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
वीज पुरवठा खंडित होणे ही बाब आता नित्याची होऊन बसली आहे. अगदी नगरपंचायत प्रशासना देखील याची माहिती आहे की, वीज पुरवठा खंडित झाला की नळ पाणीपुरवठा योजना ठप्प होते.. विशेषतः पावसाळ्यात त्याचा मोठा परिणाम जाणवतो. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन नगरपंचायतीने लोकांच्या सेवेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये नळ पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी कार्यान्वित रहावी यासाठी जनरेटर खरेदी करून त्याद्वारे नळ पाणीपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे.
या दृष्टीने नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडे आता लांजा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.













