गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात स्कॉर्पिओ नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

​रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत बेजबाबदारपणाचा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सागर दर्शन पार्किंगच्या शेजारी, भरती-ओहोटीच्या म्हणजेच पाणी येणाऱ्या संवेदनशील कार्यक्षेत्रात थेट समुद्रकिनाऱ्यावर आपली स्कॉर्पिओ गाडी नेऊन स्वतःचा आणि गाडीत बसलेल्या इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका चालकावर जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी काल दुपारी १५:५४ वाजता पोलिसांत रीतसर नोंद करण्यात आली आहे.
​या प्रकरणी पोलिसांनी गणेश शंभु महाजन (वय २८ वर्षे, व्यवसाय- ट्रान्सपोर्ट, रा. एमआयडीसी वापी, गुजरात) या संशयित आरोपीविरोधात ‘भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३’ चे कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीने आपल्या ताब्यातील गुजरात पासिंगची स्कॉर्पिओ गाडी (क्र. GJ 15 CR ७५००) ही प्रतिबंधित आणि धोकादायक अशा समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याच्या प्रवाहात नेली होती.
​जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा कृत्यांवर पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.