संतप्त ग्रामस्थ पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढणार
रत्नागिरी:
कोकणात पावसाळा आणि वादळी वारा येणं हे दरवर्षीचंच गणित असतानाही महावितरणच्या ‘शून्य नियोजना’चा फटका पुन्हा एकदा ग्रामीण भागाला बसला आहे. तालुक्यातील कासारवेली गावात वादळी वाऱ्यामुळे वीज खांब जमिनीवर कोसळले असून विजेच्या तारा अस्ताव्यस्त पडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला चार दिवस उलटून गेले, तरी महावितरणचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी गावाकडे फिरकलेला नाही. महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेले कासारवेलीतील ग्रामस्थ आता थेट पोलिसांत धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून देखभालीची आणि दुरुस्तीची कामे केल्याचे दावे केले जातात. मात्र, कासारवेलीतील परिस्थिती पाहता हे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे. “पाऊस आणि वारा येणार हे माहित असताना महावितरणने कोणती पूर्वतयारी केली होती? जीर्ण खांबांची दुरुस्ती का केली नाही?” असे संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
गेल्या चार दिवसांपासून गावात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने कासारवेलीत आता पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने पाणी उपसणे अशक्य झाले आहे.
तसेच, ज्या रस्त्यावर हे वीज खांब आणि तारा कोसळल्या आहेत, तो रस्ता स्थानिक शेतकरी आणि आंबा बागायतदार यांच्या शेतात व बागेत जाणारा मुख्य रस्ता आहे. ऐन पावसाच्या दिवसांत बागेत खत पुरवठा करणे किंवा शेतीची कामे करणे आवश्यक असताना, या पडलेल्या खांबांमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाता येत नाहीये. परिणामी, शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
चार दिवस होऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने आता कासारवेलीतील ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. शासकीय कर्तव्यात कसूर करून जनतेला वेठीस धरल्याप्रकरणी आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामस्थ आता थेट महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करणार आहेत.
आता तरी महावितरणचे डोळे उघडणार का आणि कासारवेली गावाचा वीज पुरवठा तातडीने सुरळीत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“महावितरणचे अधिकारी फक्त एसी केबिनमध्ये बसून आश्वासनं देण्यात व्यस्त आहेत, पण प्रत्यक्षात जमिनीवर कोणतंही काम दिसत नाहीये. यांच्या निष्काळजीपणामुळे आज संपूर्ण गावाला आणि वाडीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.”
— संतप्त ग्रामस्थ, कासारवेली














