लावणी करताना युवा शेतकरी घेत आहेत जाखडीचा आनंद
चिपळूण (वार्ताहर) : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. आता पावसाचे तरणा नक्षत्र सुरू झाल्यावर पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, पाऊस थांबल्याने शेतकरी आता भात लावणीच्या कामात गर्क झाला आहे. काही शेतकरी शेतात काम करताना जाखडीचा आनंद घेत आहेत.
यावर्षी पावसाने जून महिन्यापासून दडी मारली होती. त्यामुळे शेतात पेरलेले धान्य उगवले नव्हते. त्यातच कडक ऊन पडत होते. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली आणि बळीराजाने सुटकेचा निःश्वास सोडला. जुलै महिन्यात चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. चिपळूण तालुक्यातील रामपूर परिसरात शेतकरी आता भात लावणीच्या कामात गर्क झाले आहेत. पाणथळ शेतात लावणी सुरु झाली आहे. भात लावणी करताना पारंपरिक शेती गीते बोलत लावणी करणारे लहान थोर शेतकरी शेतात जाखडीच्या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. अशा रील्स सोशल मीडियावर झळकत आहेत.
लावणीची कामे सुरू झाल्याने बळीराजा मनातून सुखावला आहे. झटपट लावणी करण्याकडे त्यांचा कल आहे. कारण यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्याने लावणीचे काम सुध्दा फारच उशीरा सुरू झाले आहे. अजून सुकडीची भात शेती लावायची आहे. त्यानंतर नाचणीची लावणी सुरू होईल. मात्र, सध्या तीन दिवस पावसाने पुन्हा दडी मारली असून कडक ऊन पडत आहे.













