सावंतवाडीतील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भातरोपणीचा अनुभव; ‘बांधावरची शिवार शाळा’ उपक्रम उत्साहात

​सावंतवाडी:
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत ‘बांधावरची शिवार शाळा-२०२६’ या उपक्रमात प्रत्यक्ष भातरोपणीचा मनमुराद अनुभव घेतला. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

​मळगाव येथील सौ. व श्री. दीपक मेस्त्री यांच्या शिवार शेतीत हा उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतात उतरून भाताचे रोप काढणे आणि भाताचे रोप लावणे (लावणी) याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अभ्यासले. मेस्त्री दांपत्याकडून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आणि भात रोपणीच्या विविध टप्प्यांबद्दल सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीचे कष्ट आणि तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून जवळून अनुभवता आली.
​या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक एस.व्ही. भुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, शिवार प्रमुख सौ. व श्री. दीपक मेस्त्री, प्रशालेचे शिक्षक श्रीमती एस.यु. बांदेलकर, अनिल ठाकूर, पी.बी. बागुल तसेच स्थानिक अंगणवाडी सेविका श्रीमती खडपकर, श्रीमती राणे, विविध क्षेत्रातील पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

​विद्यार्थ्यांना हसत-खेळत शेतीचे धडे गिरवण्यासाठी आपले शेतशिवार उपलब्ध करून दिल्याबद्दल, प्रशालेचे शिक्षक अनिल ठाकूर यांनी सौ. व श्री. दीपक मेस्त्री यांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानले. शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.