देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील जीवघेण्या वळणावर अखेर ग्रामस्थानेच स्वखर्चाने लावला ‘सावधान’तेचा फलक
देवरूख (प्रतिनिधी)
प्रशासकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांचा कोडगेपणा नेमका कसा असतो, याचं ज्वलंत उदाहरण देवरूख-पांगरीमार्गे-रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील अपघातग्रस्त वळणावर पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या आणि अनेकांना कायमचे अपंगत्व देणाऱ्या या ‘मृत्यूच्या सापळ्यावर’ अखेर संतप्त ग्रामस्थ बळवंत बेंडखळे यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ‘सावधान, वाहन सावकाश चालवा पुढे धोकादायक वळण आहे’ असा फलक लावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिम्म प्रशासनाला जे जमलं नाही, ते एका सजग नागरिकाने करून दाखवल्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पांगरी येथील या धोकादायक वळणावर गेल्या ५ वर्षांत असंख्य भीषण अपघात झाले आहेत. कित्येक संसार उघड्यावर पडले, तर अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. अगदी नुकत्याच, म्हणजेच मे महिन्यात दोन तरुणांना याच वळणावर आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या जीवघेण्या वळणावर तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी पांगरी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार लेखी पत्रे दिली. अधिकृतपणे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘उपाययोजना केल्या जातील’ असे पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही हालचाल झाली नाही.
ग्रामपंचायतीचे लेखी पत्र आणि मे महिन्यातील दोन तरुणांच्या मृत्यूनंतरही जर अधिकाऱ्यांना जाग येत नसेल, तर या विभागाला अजून किती निरपराध लोकांचे बळी हवेत? असा संतप्त आणि आक्रमक सवाल आता प्रवाशी विचारत आहेत. प्रशासनाकडून कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे पाहून, आणखी कोणाचा जीव जाऊ नये या भावनेतून ग्रामस्थ बळवंत बेंडखळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने हा दिशादर्शक व अपघात प्रतिबंधक फलक तयार करून घेतला आणि वळणावर लावला. या कौतुकास्पद व प्रशासनाला चपराक लगावणाऱ्या फलक लावतेप्रसंगी संतोष कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांच्या करातून पगार घेणारे अधिकारी एसी केबिनमध्ये बसून फक्त आश्वासनांची खैरात वाटत असताना, सामान्य जनतेला मात्र स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे. आता या फलकानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार की ते आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत राहणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.













