“स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नाही! अफवांवर विश्वास ठेवू नका!” – कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे 

शॉर्टसर्किटचा धोका ओळखून वीजपुरवठा खंडित करण्याचीही क्षमता

 

सिंधुनगरी : प्रतिनिधी 

 

महावितरणच्या स्मार्ट मीटरबाबत सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून पसरविण्यात येत असलेल्या गैरसमजांना पूर्णविराम देत कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा, फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट केले. ! हे मीटर अद्ययावत प्रणालीवर आधारित असून त्याची बसवण्यात आली आहे, त्या आधारे अचूक मीटर रिडींग, दर तासाला रीडिंग नोंद त्यामुळे वापराबाबत अचूक माहिती ग्राहकाला मिळू शकते त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी महावितरण चे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले उपस्थित होते.

वनमोरे म्हणाले, स्मार्ट मीटरमध्ये फोटो काढणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे किंवा ग्राहकांवर पाळत ठेवणे अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी या संदर्भात चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात स्मार्ट मीटर हे केवळ वीज वापराची अचूक नोंद ठेवणारे आणि अधिक सुरक्षित तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आहे.

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना स्वतःच्या वीज वापरावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येते.

महावितरणच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना तासागणिक किती वीज वापरली गेली, त्याचा तपशील आणि वापराचे विश्लेषण सहज पाहता येते. त्यामुळे वीज बचतीचे नियोजन करणेही अधिक सोपे होते.

सुरक्षेच्या दृष्टीनेही स्मार्ट मीटर महत्त्वाची भूमिका बजावतात. घरातील किंवा आस्थापनातील विद्युत यंत्रणेत शॉर्टसर्किट अथवा गंभीर विद्युत बिघाडाची शक्यता निर्माण झाल्यास स्मार्ट मीटर तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे आग लागणे किंवा अन्य मोठे अपघात टाळण्यास मदत होते, असे वनमोरे यांनी सांगितले.

स्मार्ट मीटर ही ग्राहकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक यंत्रणा असून, त्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा व चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कोणतीही शंका असल्यास नागरिकांनी थेट महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत माध्यमांवरून माहिती घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे चार लाख तीन हजार विद्युत ग्राहक आहेत. त्यातील सुमारे एक लाख विद्युत ग्राहकांना हे स्मार्ट मीटर बसविले गेले आहेत. जर विद्युत बिलाबाबत शंका असेल तर त्या विद्युत मीटरची पडताळणी ग्राहकाला करता येते. ही आधुनिक प्रणाली असून याद्वारे ग्राहक आणि वीज वितरण कंपनी यांना विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या प्रणालीचा चांगला वापर होऊ शकतो. हे प्रीपेड मीटर नाहीत, वीज वितरण कंपनी सर्वच्या सर्व मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविणार आहे, याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन काळात माहिती दिली आहे असेही कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी स्पष्ट केले.

सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळात सोलर उर्जेवर वीज उपलब्ध असते, त्यामुळे सोलर विजेचा खर्च कमी असतो, त्यामुळे दिवसा विजेचा वापर वाढला तर यावर विद्युत ग्राहकांना पर युनिट सवलत मिळते. मात्र रात्री पूर्ण दराने वीज आकारणी होते असेही कार्यकारी अभियंत्याने सांगितले.

 

 

 

39 कोटीचे नुकसान

 

जिल्ह्यात वादळी पाऊस वारा यामुळे महावितरण चे 39 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 102 ट्रांसफार्मर नादुरुस्त झाले होते ते दुरुस्त करण्यात आले असून विद्युत पुरवठा सर्व ठिकाणी सुरळीत करण्यात आला आहे. उच्च दाब वीज वितरणातील 397 पोल पडले होते त्यातील 377 फोन उभे करून दुरुस्तीचे काम केले आहे. कमी दाबाच्या वितरण साखळीतील 899 पोल पडले होते त्यातील 803 पोलची दुरुस्ती झाली आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी दिली.