NHM कर्मचाऱ्यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट.! 

सेवासमावेशाबाबत मानले आभार.!

 

 १५ ऑगस्टपर्यंत नियुक्ती आदेशाची मागणी.!

 

कणकवली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेश प्रक्रियेला गती मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील NHM कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

 

यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आणि येणाऱ्या अडचणी दूर करत कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्याला दिशा मिळाली असून त्यांच्या या योगदानाबद्दल कर्मचारी कायम ऋणी राहतील.

 

भेटीदरम्यान खासदार नारायण राणे यांनी आरोग्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आरोग्य विभागात अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या NHM कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच नियुक्ती आदेश लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. १५ ऑगस्टपूर्वी नियुक्ती आदेश जारी करण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांनी आरोग्य विभागाकडे केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती आदेश खासदार नारायण राणे यांच्या हस्तेच प्रदान करण्यात यावेत, अशी मागणीही केली.

 

या भेटीवेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित होते. तसेच एक कर्मचारी -एक पुस्तक या उपक्रमांतर्गत NHM कर्मचाऱ्यांच्या वतीने खासदार नारायण राणे यांना २०७ पुस्तके भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी NHM संघटनेचे अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, रश्मी सोहनी, भोगते, मूननकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.