ऐन जुलै मध्ये नवरात्रासारखे वातावरण

सकाळी गारवा अन दाट धुके

गौरव पोंक्षे माखजन
कोकणात जुलै महिना म्हणजे मुसळधार पाऊस, धबधबे, हिरवाई आणि ढगांनी व्यापलेले आकाश, अशीच ओळख आहे. मात्र यंदा संगमेश्वर तालुक्यात निसर्गाने वेगळेच रूप दाखवले आहे. पावसाळ्याचा मध्य असतानाही पावसाने दडी मारली असून, पहाटेपासून संपूर्ण परिसर दाट धुक्याच्या चादरीत हरवून जात आहे.जणू नवरात्र सुरु झाल्यासारखे वातावरण सकाळी तयार झाले होते. पडणारे घनदाट धुके आणि त्यानंतर दुपारी पडणारे कडक ऊन यामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत पडले आहेत.
मंगळवारी पहाटेपासून संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या डोंगररांगा, दऱ्या, झाडे, घरे आणि रस्ते दाट धुक्याने पूर्णपणे झाकले गेले होते. काही ठिकाणी इतके दाट धुके होते की काही मीटर अंतरावरील वस्तूही स्पष्ट दिसत नव्हत्या. मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना दिवसा देखील हेडलाईट सुरू करून प्रवास करावा लागला. वाहनांचा वेग कमी करून सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत असल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.डोंगरांच्या कुशीत वसलेल्या संगमेश्वरचे निसर्गरम्य सौंदर्य या धुक्यामुळे अधिक खुलून दिसत होते. धुक्याच्या शुभ्र पडद्यामागे लपलेले डोंगर आणि झाडे पाहण्यासाठी अनेकांनी घराबाहेर पडून या दृश्याचा आनंद घेतला. काही नागरिकांनी या निसर्गरम्य वातावरणाचे छायाचित्रण आणि चित्रीकरणही केले. सोशल मीडियावर संगमेश्वरच्या धुक्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.
मात्र या मनमोहक दृश्यामागील वास्तव वेगळेच आहे. सकाळी ८ वाजल्यानंतर धुके हळूहळू विरळ होते आणि लगेचच कडक उन्हाची तीव्रता वाढू लागते. ढगाळ वातावरणाऐवजी निरभ्र आकाश आणि रखरखीत ऊन यामुळे हवेत उकाडा वाढत असून नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. पावसाळ्यात अपेक्षित असलेला सततचा पाऊस आणि गारवा यंदा अनुभवायला मिळत नसल्याने हवामानातील हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे.
संगमेश्वर भातशेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जुलै महिन्यात शेते पाण्याने तुडुंब भरलेली असतात.पण यावेळी ती धुक्याच्या चादरीत आच्छादलेली पाहायला मिळत आहे.साऱ्याचा परिणाम भातशेतीवर होण्याची दाट शक्यता आहे
धुक्याने संगमेश्वरचे सौंदर्य जरी खुलवले असले, तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे चित्र चिंतेचे ठरत आहे. आता दमदार पाऊस कधी बरसणार, याकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागल्या आहे.