सावंतवाडी आगाराची पणजी रत्नागिरी एसटी बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

राजापूर | प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे सुरू असलेली व चांगले प्रवाशी भारमान देणारी सावंतवाडी आगाराची पणजी रत्नागिरी ही एसटीबस सावंतवाडी आगाराकडून बंद करण्यात आल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बस पुन्हा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी प्रवाशांतुन होत आहे.

रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या अनेक गाडयांना चांगले प्रवाशी भारमान मिळते. सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी आगारातुन गेली कित्येक वर्षे पणजी रत्नागिरी ही एसटी बस सुरू होती. मात्र गेले काही महिने आगार प्रशासनाने ही बस बंद केली आहे. ही बस सकाळी १० वाजता पणजी येथून सुटुन ती दुपारी रत्नागिरीत पोहचत असे. तर रत्नागिरीतुन पहाटे ५.३० वाजता सुटून ती सकाळी पणजी येथे पोहचत असे. याला येताना पणजी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, तळेरे, खारेपाटण, राजापूर, लांजा, पाली व पुढे रत्नागिरी मार्गावर चांगले प्रवाशी भारमान मिळत असे तर परतीच्या प्रवासातही चांगले प्रवाशी भारमान मिळत असे. खास करून रत्नागिरीतुन राजापूर कणकवली व पुढे येणाऱ्या नियमित प्रवाशांना ही गाडी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होत असल्याने मोठा दिलासा मिळत होता. तर रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचा मोठा आधार होता. मात्र ही गाडी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असलेली ही गाडी सावंतवाडी आगार प्रमुखांनी सुरू करावी अशी मागणी प्रवाशांतुन होत आहे.

सावंतवाडी आगाराच्या चालक वाहकांच्या सौजन्यपुर्ण सेवेची प्रवाशांना भुरळ

सावंतवाडी आगाराच्या सावंतवाडी रत्नागिरी व अन्य गाडया रत्नागिरी जिल्हयात नियमित धावतात. यात सकाळी सुटणाऱ्या या गाडयांबरोबरच सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीतुन सावंतवाडीला जाणारी जी गाडी सुटते त्या गाडीलाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. या गाडीसह सावंतवाडी गाडयांच्या बहुतांश गाडयांवर काम करणारे चालक वाहकांचे प्रवाशांशी रअसलेले सौजन्य पुर्ण वर्तन प्रवाशांना भुरळ पाडते. मोठया प्रमाणावर प्रवाशांच्या गर्दीतही हे चालक वाहक प्रवाशांशी सौजन्याने वागतात, काही वेळा थांबा नसतानाही महिला, वयोवृध्द प्रवाशी यांना त्यांच्या इच्छीत थांब्यावर उतरतात. अनेकवेळा एसटीच्या काही चालक वाहकांचे वागणे हे फटकळ असते. मात्र सावंतवाडी आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या या वर्तनामुळे त्यांची प्रवाशांतही लोकप्रियता आहे. अनेक वेळा सावंतवाडी आगाराचे चालक वाहक बेस्ट अशा प्रतिक्रिया प्रवाशांतुन उमटत आहेत.