उपजिल्हाप्रमुखपदी सिद्धेश परब तर शहरप्रमुखपदी अजित राऊळ यांना संधी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदांवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या कार्यक्रमात नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुखपदी गुणाजी उर्फ बाळा दळवी, शहरप्रमुखपदी अजित राऊळ व उपजिल्हाप्रमुख पदी पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांची नियुक्ती करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, काका कुडाळकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील कार्यक्रमात या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. पक्षांतर्गत काही कारणामुळे गेले अनेक दिवस वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदासहित तालुका कार्यकारणी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी बरखास्त केली होती. यानंतर आज या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रभारी तालुकाप्रमुख पद हे विद्यमान पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई यांच्याकडे जबाबदारी होती. आता पक्षावाढीच्या दृष्टीने संघटना अधिक बळकट करण्याच्या हेतूने या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.













