आ. प्रमोद जठार, भाजपा नेते वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती
चिपळूण (प्रतिनिधी) : गुणदे (ता. खेड) येथील श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयात नुकताच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे आमदार प्रमोद जठार तसेच भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर उपस्थित होते.
सरस्वती शिक्षण संस्था, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान आणि कै.डॉ.अशोक आंब्रे स्मृती वाचनालय, गुणदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात समाजासाठी आदर्श ठरणारे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावी मधील प्रथम ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, माजी विद्यार्थी कै.शशिकांत राजाराम आंब्रे यांच्या स्मृतीनिमित्त ५ वी च्या विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप, तसेच सलग ८ वर्षे इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के राखल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ.अश्विनी जोशी आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले, संदीप बांदिवडेकर, पप्पू निमनकर, यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.













