शिवसेनेकडून आर्थिक मदतीचा हात
स्वप्निल कदम -कुडाळ :
मांडकुली नाईकवाडी येथील जानकी सावंत या वृद्ध महिलेच्या घरावर अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली.
यावेळी त्यांनी जानकी सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची व परिस्थितीची विचारपूस केली. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला धीर देत शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदतही सुपूर्द केली. तसेच भविष्यातही अडचणीच्या काळात शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी मांडकुली विभागप्रमुख दिलीप निचम, शाखाप्रमुख निलेश खानोलकर, विनोद नाईक, मेघू नाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीत बाधित नागरिकांना तातडीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले













