देवगड तालुक्यात BLO मार्फत मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक; अफवांवर विश्वास ठेवू नका : तहसीलदार शीतल जाधव

देवगड : महाराष्ट्रात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण-2026 (SIR) मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, देवगड तालुक्यातही ही प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक आणि नियमानुसार सुरू असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार शीतल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 

30 जून 2026 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांना पूर्वभरलेले गणना प्रपत्र (Pre Filled Enumeration Form) वितरित करत आहेत. या प्रपत्रामध्ये मतदाराची सध्याची माहिती तसेच आवश्यक असल्यास आई-वडील किंवा आजी-आजोबांची माहिती भरता येणार असून, नवीन छायाचित्रही सादर करता येणार आहे. घर बंद आढळल्यास संबंधित BLO किमान तीन वेळा भेट देऊन त्याची नोंद ठेवणार आहेत. त्यानंतर योग्यरीत्या भरलेले व स्वाक्षरी केलेले प्रपत्र संकलित केले जाणार असून, मतदारांना ही माहिती ऑनलाइन पद्धतीनेही सादर करता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

18 जुलै 2026 रोजी काही वृत्तपत्रांमध्ये “मर्जीतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून मतदार यादी विशेष पुनरीक्षणाचे फॉर्म भरून घेण्याचा प्रकार” अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, देवगड तालुक्यात असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे तहसीलदार शीतल जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

 

प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, देवगड तालुक्यातील सर्व BLO यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित नियमांनुसार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत सर्व कामकाज निर्धारित कार्यपद्धतीनुसार व पारदर्शक रीतीने सुरू आहे. तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) देखील या प्रक्रियेत सहकार्य करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

मतदार यादी विशेष पुनरीक्षण-2026 अंतर्गत अर्ज स्वीकारणे, माहिती संकलन व आवश्यक कार्यवाही ही सर्व पात्र मतदारांसाठी समान निकषांवर केली जात असून, कोणालाही प्राधान्य देणे किंवा मर्जीतील BLO मार्फत अर्ज भरून घेण्याचा प्रकार देवगड तालुक्यात झालेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा ही संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्व पात्र मतदारांसाठी समान निकषांवर राबवत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी शीतल जाधव यांनी केले आहे.