जीआयटी कॉलेज लवेल येथे “हॉर्नबिल देवराई” उपक्रमाचे दिमाखात उद्घाटन

 महाविद्यालयात “हॉर्नबिल क्लबची” स्थापना

चिपळूण (प्रतिनिधी) : पर्यावरणसंवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि तरुण पिढीमध्ये निसर्गाविषयी सजगता निर्माण करणाऱ्या उद्देशाने दि. १४ जुलै रोजी लवेल (ता.खेड) येथील नामांकित घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात “हॉर्नबिल देवराई” या अभिनव उपक्रमाचे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या महाविद्यालयीन परिसरात निसर्ग संरक्षणाचा एक नवा अध्याय सुरू झाला असून याप्रसंगी महाविद्यालयामध्ये हॉर्नबिलक्लबची अधिकृत स्थापना देखील करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी चिपळूण वनविभागाच्या विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. हा संपूर्ण प्रकल्प सह्याद्री संकल्प सोसायटी देवरुख या नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या आणि वनविभाग चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने व तांत्रिक सहकार्यातून साकारला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात हॉर्नबिल धनेश पक्षांना आकर्षित करणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याने झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात मुख्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी डॉ. नितीन कोळेकर यांनी केले. महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या शाश्वत विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांनी दिली. या सोहळ्याचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेला “हॉर्नबिलक्लब” या क्लबच्या माध्यमातून भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सह्याद्री संकल्प सोसायटीचे संचालक प्रतीक मोरे यांनीआपल्या प्रेझेंटेशनमधून दिली. प्रमुख पाहुण्या चिपळूण वनविभागाच्या गिरीजा देसाई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले व घरडा इन्स्टिट्यूटसारखे असे शैक्षणिक संस्थेने देवराई उभारण्यासाठी पुढे येणे ही अत्यंत कौतुकास्पद आणि दिशादर्शक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले, वनविभाग याप्रकल्पासाठी नेहमीच पाठीशी उभा राहील याची ग्वाही त्यांनी यावेळेला दिली.
प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अत्यंत भाविक व तितकाच खंबीर निर्धार व्यक्त केला. देवराईची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी घेतील हा निर्णय त्यांनी जाहीर केला. महाविद्यालयातील CES विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रतिक ओक यांनी हा प्रकल्प उभाराहण्यासाठी करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.